कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हेलिकॉप्टर उड्डाण मंगळवारी अचानकपणे रद्द झाले. त्यामुळे संतापलेल्या ममतांनी भाजपवर निशाणा साधत राजकीय घातपाताचा आरोप केला. ममतांच्या बोनगांव दौऱ्यासाठी भाडेकरारावर हेलिकॉप्टर निश्चित करण्यात आले. मात्र, परवान्याची मुदत संपली असल्याने आणि विमाविषयक त्रुटींमुळे त्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ममतांना कारने प्रवास करणे भाग पडले. संबंधित ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. सभेत बोलताना त्यांनी उशीरा पोहचल्याबद्दल उपस्थितांची माफी मागितली. मागील ७ ते ८ महिने मी हेलिकॉप्टरने प्रवास केला नाही. आताच्या दौऱ्यासाठी मी हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. त्यासाठी घरातून निघत असताना मला हेलिकॉप्टर उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळाली. विधानसभा निवडणुकीला अजून अवधी आहे. मात्र, आतापासूनच संघर्ष सुरू करण्यात आला आहे. माझ्याशी कुठला खेळ करण्याचा प्रयत्न करू नका. मी खेळ सुरू केला; तर तुम्हाला सुगावाही लागणार नाही. राजकीयदृष्ट्या तुम्ही माझ्याशी लढू शकत नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. दरम्यान, बंगाल भाजपने राजकीय घातपाताचा ममतांचा आरोप फेटाळून लावला. ममतांचा आरोप हास्यास्पद आहे. हेलिकॉप्टर उड्डाणाला संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली असेल; तर त्यामागे वैध कारणे असू शकतात. ममतांनी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.