कोलकाता : तृणमूल काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, लोकांसाठी लढणारी एक चळवळ आहे. आम्ही कोणत्याही अनिष्ठ शक्तींसमोर झुकणार नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तृणमूल काँग्रेसच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा निर्धार व्यक्त केला. १ जानेवारी १९९८ रोजी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती.तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये डाव्या आघाडीची प्रदीर्घ सत्ता मोडीत काढली होती. या ऐतिहासिक प्रवासाचे स्मरण करताना ममता म्हणाल्या की, मातृभूमीचा सन्मान, बंगालचा विकास आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण हीच आमच्या पक्षाची मूलभूत तत्त्वे आहेत. माँ, माती, मानुष या ध्येयाने सुरू झालेली ही वाटचाल आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या बलिदानातून आणि निष्ठेतून सुरू आहे.जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर टीएमसी देशातील प्रत्येक व्यक्तीसाठीच्या लढ्यात ठामपणे उभा राहील असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी बोलुन दाखवला. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही समाजमाध्यमाद्वारे कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पक्षाची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांच्या शिस्तीत आणि त्यागात आहे. बदलासाठी सुरू झालेली एक चळवळ आज एका शक्तिशाली लोकशाही शक्तीमध्ये रूपांतरित झाली आहे.अभिषेक बॅनर्जी यांनी बंगालविरोधी जमीनदारी शक्तींवर टीका करत स्पष्ट केले की, जोपर्यंत पक्ष सामान्य जनतेशी जोडलेला आहे, तोपर्यंत कोणतीही अहंकारी शक्ती बंगालचा संकल्प मोडून काढू शकणार नाही. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आमच्यासाठी जनतेची सेवा हीच खरी भक्ती आहे. पश्चिम बंगालमध्ये अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आपल्या २८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या तृणमूलने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत जनमानसात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु केले आहे.