Mamata Banerjee | भाजपचे सरकार आल्यास ममता बॅनर्जी यांची तुरुंगात रवानगी होईल, असा दावा पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या कथित गैरकृत्यांचा निषेध करण्यासाठी संदेशखळी येथे महिलांना अटक केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावं लागेल, असा अधिकारी यांनी इशारा दिला आहे. 2024 च्या सुरुवातीला संदेशखळी येथे शेख शाहजहानसह स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून कथित जमीन हडप आणि महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली होती. याबाबत भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, 2026 मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यास संदेशखळी घटनेसंदर्भात आयोग स्थापन केला जाईल. संदेशखळी येथील आंदोलक महिलांना अटक करून ममता बॅनर्जी यांनाही तुरुंगात पाठवले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हेतू वाईट आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संदेशखळी येथील महिलांना अटक करण्याचा कट ममता यांनी रचला होता. भाजप सत्तेवर आल्यास अशा दडपशाहीला प्रोत्साहन दिल्याबद्दल ममता बॅनर्जींना कारवाईला सामोरे जावे लागेल. आम्ही कायद्याच्या आधारे बदला घेऊ,” असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना दिला. …म्हणून टीएमसीने बसीरहाट जागा जिंकली पुढे सुवेंदू अधिकारी म्हणाले की, “मुस्लिम मतांमुळे टीएमसीने बसीरहाट जागा जिंकली. मात्र संदेशखळी विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. संदेशखळीतील पुढील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागतील कारण हिंदू आधीच संघटित झाले आहेत. त्यांनी टीएमसीचा दडपशाही पाहिला आहे आणि ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मतदान करतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेमकं प्रकरण काय? फेब्रुवारी 2024 मध्ये संदेशखळी भागातील काही स्थानिक TMC नेत्यांवर महिलांवर सामूहिक बलात्कार आणि जमीन बळकावल्याचा आरोप होता. पार्श्वभूमीवर सीएम ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संदेशखळीला भेट दिली आणि गावाविषयी खोट्या बातम्या पसरवण्यासाठी मोठा पैसा खर्च केल्याचा आरोप केला. या घटनेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संदेशखळी दौऱ्यात सांगितले की, “मला माहित आहे की, यामागे मोठा खेळ होता, त्यात पैसा गुंतला होता, पण नंतर लोकांना कळले की हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. शेवटी सत्य बाहेर येते. पुढे गेले आहेत, मला या गोष्टी माझ्या मनात ठेवायची नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा: पिंपरी : बंदोबस्तावरून घरी जाताना काळाचा घाला; पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू