कोलकाता: पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) टाकलेल्या धाडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आय-पॅक (I-PAC) या संस्थेच्या कार्यालयावर आणि संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर धाड पडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने थेट घटनास्थळी धाव घेतली, त्याचे पडसाद आता देशभर उमटत आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी (PDP) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ममता बॅनर्जींचे ‘शेरनी’ अशा शब्दांत वर्णन करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, “ममता बॅनर्जी अत्यंत शूर आहेत, त्या एक शेरनी आहेत. त्या या संकटाचा कणखरपणे मुकाबला करतील आणि कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाहीत.” मुफ्ती यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर अशा प्रकारच्या कारवाया आमच्यासाठी सामान्य झाल्या होत्या. त्यावेळी जेव्हा तीन माजी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले, तेव्हा अनेक राजकीय पक्षांनी मौन बाळगले होते. मात्र, आता तपास यंत्रणांचा हाच वापर संपूर्ण देशात पाहायला मिळत असून देश त्याची ‘चव’ चाखत आहे. गुरुवारी कोलकाता येथे नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. कोळसा घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग आणि हवाला प्रकरणी ED ने प्रतीक जैन यांच्या घरी आणि आय-पॅकच्या कार्यालयावर छापेमारी सुरू केली होती. ही बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तातडीने प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी ED पथकाने जप्त केलेली काही कागदपत्रे, फोन आणि हार्ड डिस्क ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेली. त्यानंतर त्या पोलीस आयुक्तांसह बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह आय-पॅकच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्या ठिकाणी त्या तब्बल चार तास ठाण मांडून बसल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, “तृणमूल काँग्रेसची निवडणूक रणनीती चोरण्यासाठी भाजपने ED ला आय-पॅकच्या कार्यालयात पाठवले आहे. बंगालमध्ये भाजपने तपास यंत्रणांच्या गैरवापराची सुरुवात केली आहे, पण त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.” या घटनेमुळे बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य अशा संघर्षात अडकले असून, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.