कोलकता : भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांना लक्ष्य केले जात आहे. बंगाली बोलणाऱ्या भारतीयांना बांगलादेशी ठरवलं जातयं. वैध कागदपत्रे बाळगणाऱ्यांवरही अवैध बांगलादेशी स्थलांतरित म्हणून शिक्का मारला जातोयं, असे टीकास्त्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोडले. विधानसभेत बोलताना तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममतांनी भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला. भाषेवरून भारतीयांवर बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवला जात आहे. मतदार ओळखपत्र, पॅन आणि आधार कार्ड असणाऱ्यांनाही भाजपशासित राज्यांमध्ये उदरनिर्वाह करण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ममतांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. ममतांचे सरकार भ्रष्ट असल्याच्या घोषणाही त्यांनी दिल्या. नंतर भाजप आमदारांनी सभात्याग केला. ते सभागृहाबाहेर पडल्यावरही ममतांनी भाजपवरील टीकेचे सत्र कायम ठेवले. भ्रष्ट सरकार या भाजप आमदारांच्या घोषणेवर ममतांनी प्रत्युत्तर दिले. माजी खासदार म्हणून मिळणारी दीड लाख रूपयांची पेन्शन मी स्वीकारली नाही. भाजपचे आमदार मला नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा शिकवणार का? माझ्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवरून त्यांचीच संस्कृती आणि नीतिमत्ता उघड होते. तशी टीका जनतेसमोर त्यांचा चेहरा उघड करते. माझे शब्द ध्यानात ठेवा. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप शुन्यावर येईल. जनतेने त्या पक्षाचे राजकारण नाकारले आहे, असे त्या म्हणाल्या.