पुणे(प्रतिनिधी) – भाच्याने दारू पिण्यासाठी पन्नास रुपये दिले नाहीत म्हणून मामाने भाच्यावर खूनी हल्ला केला. भाच्यावर धारदार चाकूने गळ्यावर आणि हातावर वार करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शांताराम धोंडीबा पवार(वय 50,रा.भाजी मार्केट, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. तर राजू भारत डोंगरे(वय 38) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी डोंगरे यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी शांताराम पवार हा सेंट्रींगची कामे करतो, तर त्याचा भाचा राजु डोंगरे हा मदर तेरेसा आश्रमात सुरक्षा रक्षक आहे. ते दोघेही एकाच परिसरात रहातात. शनिवारी रात्री शांताराम राजू यांच्या घरी गेला होता. त्याने दारु पिण्यासाठी राजुला 50 रुपये मागितले.
राजुने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. राजू यांची पत्नी भांडणे सोडविण्यासाठी गेली असता, तीलाही शिवीगाळ करण्यात आली. यानंतर शांतारामने अचानक घरातील भाजी कापण्याचा चाकू घेऊन राजूच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार केले.
राजू गंभीर जखमी झाल्यावर शांताराम तेथून पळून गेला. यानंतर राजू यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समीर करपे करत आहेत.