नेवासा – तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच शैला उभेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, अहिल्यानगर यांच्याकडून पंचायत समितीला देण्यात आले आहेत. या आदेशामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर हा गैरव्यवहार शासनाने त्यांच्या अहवालातून उघड केला. बेकायदेशीर झालेल्या कामाची पाहणी प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित दखल घेतली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत दप्तर रेकॉर्ड पाहणी करून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला. त्या अहवालात त्यांनी गैरव्यवहार सिद्ध झाल्याचे नमूद केलेले असून सरपंच उभेदळ व ग्रामसेवक इंगळे यांच्यावर रक्कम वसूल करण्याच आदेश अहवालामध्ये दिले आहेत. दरम्यान, बेकायदेशीर काढलेली रक्कम वसुली करण्यात आलेला अहवाल आदेश आणि सरपंच व ग्रामसेवकावर कार्यवाही न झाल्यास 26 जानेवारी रोजी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमृत उभेदळ यांनी दिला आहे. तर सरपंच व ग्रामसेवक हे दोषी असूनही काही प्रसारमाध्यमांमध्ये आपली चांगली छबी उमटविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुरेशनगरचे ग्रा.पं.सदस्य विकास उभेदळ करत आहेत. या बाबीमध्ये सरपंच शैला उभेदळ व तत्कालीन ग्रामसेवक के. बी. इंगळे यांनी अनियमितता केल्याचे दिसून येत आहे. सुरेशनगरमध्ये बेकायदेशीर काढलेली रक्कम सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्याकडून समप्रमाणात वसूल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अहिल्यानगरचे जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.