Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान यांना विषारी साप असे संबोधले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्ट यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी याचिकेवर नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंग यांच्यासमोर पार पडली. यापूर्वी खालच्या न्यायालयाने खर्गे यांना दिलासा दिला होता. मात्र आता उच्च न्यायालयीन स्तरावर या प्रकरणाचा पुन्हा आढावा घेतला जात आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालय ठरवणार आहे की खर्गे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई होणार की नाही. हे प्रकरण 2023 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकांशी संबंधित आहे. एका प्रचारसभेत खर्गे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना सापाशी केली होती. संघाचे सदस्य रविंदर गुप्ता यांनी हे मानहानीकारक आणि द्वेष पसरवणारा वक्तव्य असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि संघाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्यानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की त्यांचे वक्तव्य कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून विचारधारे विरुद्ध होते. आता न्यायालय त्यांची ही बाजू स्वीकारते की प्रकरण पुढे जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.