बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी सशस्त्र दलांना पूर्ण मोकळीक दिल्याचे जाहीर केले. मग, ते ऑपरेशन सिंदूरचे श्रेय का घेत आहेत? त्यांनी स्वत:ची स्तुती टाळावी, असा उपरोधिक सल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी दिला. मागील काही दिवसांत मोदींच्या विविध राज्यांत सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूरविषयी भाष्य करत पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. त्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर खर्गेंनी मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या प्रत्येक वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, सत्तेत असणाऱ्यांनी काही वेळा बोलणे टाळायला हवे अशी माझी विनंती आहे. मोदींनी तूर्त निवडणूक प्रचारापासून दूर राहून देशावर फोकस करावा. देशात काय घडले त्याची जाण ठेऊन त्यांनी बोलावे. मोदींनी कुठल्या बढाया मारण्याऐवजी देशाच्या शत्रुवर लक्ष केंद्रित करावे. संवेदनशील काळात राजकीय संयम बाळगण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. भारतीय सशस्त्र दलांना कॉंग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याचा पुनरूच्चार खर्गे यांनी केला. लष्कर असेपर्यंत आपण सर्व सुरक्षित आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.