मलकापूर नगरपालिकेचा देशात 25 वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये एक पाऊल पुढे; पश्चिम महाराष्ट्रात 11 वा क्रमांक
कराड (प्रतिनिधी) – स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय यांनी घेतलेल्या 2020 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मलकापूर नगरपरिषदेने 2018 व 2019 च्या तुलनेने भरारी घेतली आहे. देशामध्ये 25 वा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये 11 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
मलकापूर नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तत्कालीन नगर पंचायतीचा पश्चिम भारतामध्ये 146 वा क्रमांक तर 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशामध्ये 66 वा व पश्चिम भारतात 51 वा क्रमांक आला होता. मलकापूर नगरपरिषदेने समाजातील सर्व घटक व नागरिक यांच्या लोकसहभागातून सन 2020 मध्ये पहिल्या 10 मध्येच येण्यासाठीचे ध्येय ठेवले व त्याप्रमाणे काम करुन देशपातळीवरील 1 लाखाच्या आत लोकसंख्या असणाऱ्या 4 हजार 383 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 25 वा व पश्चिम भारतातील 1003 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 11 वा आणि महाराष्ट्र राज्यातील 396 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 वा क्रमांक प्राप्त केलेला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 ही स्पर्धा 6 हजार गुणांची असून याची विभागणी प्रामुख्याने 4 घटकात केलेली आहे. प्रत्येक घटकास 1500 गुण आहेत. त्यापैकी पहिला घटक सेवा पातळी प्रगती असून यामध्ये नगरपरिषदेस 1211.38 गुण, दुसरा घटक प्रमाणपत्र (3 स्टार रेटींग व ++) असून यामध्ये 1100 गुण, तिसरा घटक प्रत्यक्ष पहाणी असून यामध्ये 1097.83 गुण व चौथा घटक सिटीजन फिडबॅक असून यामध्ये 1187.49 असे एकूण 4596.70 गुण प्राप्त झाले आहेत.
मलकापूर नगरपरिषदेस देशामध्ये 25 वा क्रमांक प्राप्त होण्यापाठीमागे मलकापूर शहरातील विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिकांचे, तरूण मंडळे, स्वच्छतादूत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक-शिक्षिका, सर्व जिल्हा परिषद व खासगी शाळांचे विद्यार्थी, नगराध्यक्षा नीलम येडगे, सभापती राजेंद्र यादव, आनंदी शिंदे, कमल कुराडे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, नगरसेवक व नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर योगदान लाभले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये मलकापूर नगरपरिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम पूर्ण करुन शहर पहिल्या पाचमध्ये आणण्याचा सर्वांनी मनोदय व्यक्त केला आहे. तो लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच मलकापूर नगरपरिषदेस मिळालेल्या सन्मानाबद्दल ना. बाळासाहेब पाटील, ना. सतेज पाटील, ना. शंभूराज देसाई, ना. विश्वजीत कदम, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरपरिषदेचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत





