Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा; खोडकीसाठी प्रति टन २०० रुपयांची घोषणा
Malegaon Sugar Factory : शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आणि नवीन ऊस लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांवरील आर्थिक भार हलका करण्यासाठी माळेगाव कारखान्याचा निर्णय.

Malegaon Sugar Factory – माळेगाव कारखान्याकडून दरवर्षी कांडे पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यंदाही घेतलेल्या या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या शेतकरीहिताच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत यंदाही परंपरेप्रमाणे प्रति टन २०० रुपये खोडकी (कांडे) पेमेंट जाहीर केले आहे.
कारखान्याच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात नवीन ऊस लागवडीचा हंगाम सुरू होत असताना तसेच शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत असतो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने माळेगाव कारखान्याकडून दरवर्षी कांडे पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
यंदाही घेतलेल्या या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या शेतकरीहिताच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, कांडे पेमेंट जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाकडे विविध स्तरांवर निवेदने देत सातत्याने पाठपुरावा केला होता.
या मागणीची दखल घेत कारखान्याने पेमेंट जाहीर केल्याने शेतकरी व संघटनांच्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या बैठकीस उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. कांडे पेमेंटच्या निर्णयाची माहिती संगीता कोकरे, बाळासाहेब तावरे, नितीन सातव, विजय तावरे आणि नितीन शेडे यांनी दिली.
ऊस उत्पादकांना दिलासा
मागील गळीत हंगामात केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी ३२६९ रुपये प्रति टन असताना माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ३३०० रुपये अदा करून शेतकरीहित जपले होते. आता नव्या गळीत हंगामाच्या तोंडावर पुन्हा २०० रुपये प्रति टन कांडे पेमेंट जाहीर झाल्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






