माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक: २१ जागांसाठी ५९३ उमेदवारांचे अर्ज

बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून २१ जागांकरिता एकूण ५९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज शेवटच्या दिवशी शरद पवार गटासह अन्य दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या निवडणुकीत उतरली आहे. त्यामुळे माळेगावच्या रणांगणात काटे की टक्कर होणार हे मात्र निश्चित. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव कारखान्यासाठी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्जाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सहकार क्षेत्रात राज्यात आदर्शवत समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत चुरस निर्माण होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या विरोधात सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून चंद्रराव तावरे तसेच माजी चेअरमन रंजन तावरे उभे ठाकले आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीतून माघारी घेत तटस्थ भूमिका घेतलेल्या शरद पवार गटाने देखील माळेगावच्या रणांगणात दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. शिरतोड गटातील काही उमेदवारांनी देखील आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे माळेगावची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामध्ये दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शरद पवार गटातील उमेदवारांचा देखील समावेश आहे. एकूण ५९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. २८ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २९ मे ते १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १३ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
माळेगाव गटातून ५१, पणदरे ७९, सांगवी ५४, खंडज- शिरवली ६६ , निरावागज ५९, बारामती ७९, महिला राखीव ६८, अनुसूचित जाती जमाती वीस, भटक्या जमाती ६४, इतर मागास प्रवर्ग २५, ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन २८ अर्ज दाखल झाले आहेत.





