मालेगाव अत्याचार प्रकरण: ‘या’ मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेवासे फाट्यावर तीव्र आंदोलन

नेवासा: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे गावात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आरोपीस समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी नेवासे तालुका सकल मराठा समाजाने शनिवार (दि. २२) रोजी नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात तीव्र आंदोलन केले.
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनात युवकांनी तीव्र संताप व्यक्त करत “आरोपीला फाशी झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी या घटनेचा निषेध करत, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केली.
कृष्णा मोटे, अनिकेत बोरुडे, प्रमोद घोलप, इरफान शेख, जाहिद शेख, पंकज नवगिरे, पार्थ मोटे, गणेश झगरे आदींनी आपल्या भावना व्यक्त करत घटनेचा निषेध केला. आंदोलकांनी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रस्ता रोको न करता राजमुद्रा चौकात निषेध व्यक्त केला आणि नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





