पिंपरी – शहरातील नागरिकांना आता मलकुंडातील (सेप्टीक टॅंक) मैला उपसा करुन वाहून नेण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहेत. निवासी आणि खासगी मिळकतींमधील मलकुंडातील मैला उपसून नेण्यासाठी नागरिकांना प्रतिखेप 1500 व 2500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निर्णय घेण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे.
निवासी मिळकत अथवा खासगी मिळकतींमधील मलकुंडातील मैला तीन वर्षांच्या कालावधीत उपसा करणे अनिवार्य आहे. आजपर्यंत महापालिकेच्या ठेकेदारामार्फत निशूल्क मलउपसा केला जात होता. मात्र, याबाबत महापालिकेने ठराव करुन मैला उपसून नेण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका सेप्टीक व्हॅन उपलब्ध करून देत असली तरी आता यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. निवासी आणि व्यवसायिक मिळकतींना मलकुंडातील मैला उपसून नेण्यासाठी प्रतिखेप अनुक्रमे 1500 रुपये आणि 2500 रुपये आकारले जाणार आहेत.
मलकुंडातील मैला उपसा करुन मलमूत्र, सांडपाणी, खासगी गटारे, मलवाहिनी, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, रस्ता, मोकळ्या जागा, जलसाठे, जलमार्ग, शेतजमीनी अथवा अन्य ठिकाणी उत्सर्जित केल्यास ठेकेदाराला दंड आकारण्याची तरतूद आरोग्य विभागाने केली आहे. मलउपसा हा निवासी मिळकतींमधील असेल तर पहिल्या वेळेस 200, दुसऱ्या वेळी 300 आणि पुढील प्रत्येक वेळी 400 रुपये दंड आकारला जाणार आहे. जर मैला व्यवसायिक मिळकतींमधील असेल तर संबंधित ठेकेदाराला पहिल्या वेळेस 500 रुपये, दुसऱ्या वेळेस 750 रुपये आणि पुढील प्रत्येक वेळी 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
..तर खासगी सेप्टीक वाहनांवर कारवाई
खासगी मलउपसा वाहनांना वैयक्तीक पातळीवर मलउपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जर, अशा वाहनांद्वारे मलउपसा करावयाचा झाल्यास त्या वाहनांची महापालिकेकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्याकरिता एक वर्ष कालावधीसाठी 10 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणी नसलेल्या वाहनांद्वारे निवासी मिळकतींमधील मैला उपसा केल्यास एका खेपेला 3 हजार रुपये दंड भरावा लागणार असून व्यवसायिक मिळतीमधील मलउपसा केल्यास प्रत्येक खेपेला 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दर तीन वर्षांनी मलकुंड साफ केला पाहिजे, असे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.