नवी दिल्ली: वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या जीवाला भारतात धोका असून तो मलेशियातच राहिल, असे मलेशियाचे पंतप्रधान महातिर बिन मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे. नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत मलेशियातील एका मंत्र्यांने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुद्दा मांडला होता, यावर तिथल्या पंतप्रधानांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
नाईकने काही दिवसांपुर्वी एक वादग्रस्त विधान केले होते. ज्यात तो म्हणाला होता की, मलेशियात राहणारे हिंदू मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांच्यापेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती अधिक प्रामाणिक आहेत. यावर मलेशियाचे मनुष्यबळ विकास मंत्री एम. कुलसेगरन यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर आवाज उठवला होता.
कुलसेगरन यांनी म्हटले की, झाकिर नाईकला मलेशियातील अंतर्गत बाबींवर टीका करण्याचा किंवा स्थानिक समुदायांबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्याला अशा प्रकारे स्थानिक लोकांना अपमानीत करण्याचा विशेषाधिकार देता कामा नये.
मंत्री कुलसेगरन यांनी पुढे म्हटले की, झाकीर नाईकचे वक्तव्य हे तो कायमस्वरुपी मलेशियाचा रहिवासी झाल्याचा निकष नाही. त्यामुळे मलेशियातील हिंदूंवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नाईकवर कारवाई व्हायला हवी तसेच त्याला भारताच्या हवाली करायला हवे मात्र, या मंत्र्याची मागणी मलेशियाचे पंतप्रधान महातिर बिन मोहम्मद यांनी धुडकाऊन लावत नाईकच्या जीवाला धोका असल्याने तो मलिशियातच राहिल असे त्यांनी म्हटले.