“मलांग’ आणि “छलांग’ला नवीन रिलीज डेट

मोहित सुरीचा “मलांग’ आणि हंसल मेहताचा ‘छलांग’ या दोन्ही सिनेमांसाठी आता नवीन रिलीज डेट जाहीर झाल्या आहेत. मलांगमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटणी आहेत. हा सिनेमा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज करण्याचे पूर्वी ठरले होते. आता ही रिलीजची तारिख एक आठवड्याने अलीकडे ओढण्यात आली आहे.
आता मलांग 14 ऐवजी 7 फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. यातील आपला लुक अनिल कपूरने यापूर्वीच मंगळवारी आपल्या वाढदिवशी रिलीज केला होता. तर राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांचे लीड रोल असलेला छलांग पुढच्या वर्षी 31 जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र आता हा सिनेमा 13 मार्चला रिलीज होणार आहे.
दिवाकर बॅनर्जीच्या 2010 मध्ये आलेल्या लव्ह, सेक्स और धोकामध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरुचा एकत्र होते. आता छलांगमध्ये हे दोघेजण पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या दोन्ही सिनेमांनी आपल्या रिलीज डेट बदलण्याची खरी खुरी कारणे स्पष्ट केलेली नाहीत. कदाचित वितरणाशी संबंधित समस्यांमुळे या रिलीज डेट बदलल्या गेल्या असाव्यात.





