मदनदादा की मकरंदआबा?

सातारा – पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी सभासद सत्तेचा कौल कोणाला देणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. आ. मकरंद पाटील की विद्यमान चेअरमन मदन भोसले यांच्याकडे सत्ता सोपवली जाणार याचे उत्तर उद्या दि. 5 रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर मिळणार आहे.
चार आमदारांनी लक्ष घातल्याने अटीतटीच्या झालेल्या किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत मंगळवारी एकूण 70 टक्के मतदान झाले. 21 जागांसाठी 46 संचालकांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे.वाई, खंडाळा व कोरेगाव या तीन तालुक्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. कारखान्यावर असलेली थकीत देणी, कार्यक्षेत्रामध्ये अजूनही उभा असलेला शेतकऱ्यांचा ऊस, प्रत्यक्ष गाळप हंगामाला झालेला उशीर, या प्रश्नांना नूतन संचालक मंडळाला निवडणुकीनंतर प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाद्वारे सामोरे जावे लागणार आहे. बावधन, कवठे आणि ओझर्डे गटामध्ये सभासद शेतकरी कोणता कौल देतात याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
वाई येथील औद्योगिक वसाहतीत श्रीनिवास मंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणपत खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी उशिरा किसन वीर कारखान्याच्या निकालाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जान्हवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी मंगल कार्यालय परिसरामध्ये सुमारे साडेतीनशे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.


