छत्रपती संभाजीनगर : आजकाल अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये तरुणाई सगळ्यात पुढे आहे. यामध्ये तरुणाई धारदार शस्त्रांसह रील्स बनवत आपली दहशत माजवताना दिसत आहे. अशी रील बनवून दहशत माजवणाऱ्यांवर पोलीस वेळोवेळी कारवाई करताना दिसत आहेत. मात्र तरीही हे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. पोलिसांनी लढवली शक्कल इन्स्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या तरुणांची छत्रपती संभाजीनगरमधल्या पोलिसांनी शहरभर धिंड काढली आहे. संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून इन्स्टाग्रामवर रिल्स काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या रिल्समध्ये तरुणांनी कमरेला पट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन कॉलर उडवत इन्स्टाग्रामवर रील व्हायरल केली होती. यानंतर पाचोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पाचोड पैठण चौकातून धिंड काढली आणि मग त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. इन्स्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या या तरुणांची भाईगिरी पोलिसांनी धिंड काढून उतरवली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.