पिंपरी, चिंचवड रेल्वे स्थानकांचा ‘मेकओव्हर’

पिंपरी – पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील पिंपरी आणि चिंचवड या दोन रेल्वे स्थानकांचे मेकओव्हर करण्यात येणार आहे. दोन्ही स्थानकांवर विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात देखील शहरातील प्रवाशांसाठी सुविधा उभारण्यात येणार आहे अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. 3) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पिंपरी व चिंचवड या दोन्ही स्थानकांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली होती. त्याची दखल घेत रेल्वेने पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबत रेल्वेच्या पुणे कार्यालयाने आमदार जगताप यांना पत्र पाठवून कळवले आहे.
शहरातील प्रवाशांना पुणे रेल्वे जंक्शन येथे जावे लागते. परंतु, पुणे रेल्वे जंक्शन अपुरे पडत आहे. रेल्वे वाहतुकीचे वाढते प्रमाण टिकवण्यासाठी पर्यायी जंक्शन विकसित करणे काळाची गरज आहे. त्याचा विचार करून पुणे-मुंबई रेल्वेलाईनला लागून असलेल्या पिंपरी येथील डेअरी फार्मच्या सुमारे 50 ते 60 एकर वापराविना पडून असलेल्या जागेवर नवीन अत्याधुनिक रेल्वे जंक्शन विकसित करण्यात यावे. त्याचप्रमाणे पिंपरी आणि चिंचवड या दोन रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.
पिंपरी रेल्वे स्थानकांत 25 केडब्ल्यूपी क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. तसेच 30 केडब्ल्यूपी क्षमतेचे आणखी एक सोलर पॅनल लवकरच बसवले जाणार आहे. स्थानकात प्रवाशांना ये-जा सुलभपणे करता यावे यासाठी एक एक्सेलेटर उपलब्ध केले आहे. आसन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच निसर्गरम्य चित्रांच्या थीमवर आधारित पेटिंगद्वारे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच स्थानकांत पाणी ऑटोमेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी रेस्टॉरंट ऑन व्हील उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूला नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आल्याचे रेल्वेने पत्राद्वारे कळवले आहे.





