मुंबई – जैन समाज शांतिप्रिय आहे, पण सहनशीलतेचीही मर्यादा असते. विले-पार्ले येथील जैनालय बुलडोझरने पाडणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे काही गद्दार नेते समाज तोडण्याचे काम करत आहेत, त्यांची खैर नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, सगळी सफाई होईल, असा सनसनाटी सल्ला जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिला. एका खासगी वृत्तवाहिनीने जैन मुनी निलेश चंद्र यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी दादर येथील कबुतरखान्यावरून मनसे आणि ठाकरे बंधूंचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, तुम्हाला मराठी प्रेम असेल तर भेंडीबाजार, मुंब्रा या मुस्लिमबहुल भागांत जा. तिथे एका वर्षात शंभर कबरी उभ्या राहिल्या, बांगलादेशी घुसखोर राहतात, त्याची तुम्हाला चिंता नाही. फक्त मारवाडी-जैन समाजाच्या कबुतरखान्यावरच का बोलता ?,आम्ही हजारो वर्षांचा प्राचीन, अहिंसक समाज आहोत. कुणाचे मंदिर-घर पाडून आम्ही जैनालय बांधले नाही. पण आमचे मंदिर पाडले, तर अवैध मशिदी का सुटल्या? वेळ आली तर आम्हीही शस्त्र हाती घेऊ, असा थेट इशाराच त्यांनी यावेळी दिला. जैन समाजाला स्वतंत्र राजकीय पक्ष उभारण्याचा विचार असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले, प्रत्येक समाजाचा पक्ष आहे, आमचा नाही. त्यामुळे आम्हाला इकडे-तिकडे भटकावे लागते. आता आम्हीही स्वतःचा पक्ष काढू. जो हिंदू हिताचा असेल त्यालाच आमचे समर्थन राहील. महापालिका निवडणुका जवळ आल्या की जाती-भाषेच्या नावावर भेदभाव सुरू होतो, निवडणुका संपल्या की हे सगळे वातावरण निवळते, असा टोलाही मुनींनी या राजकीय नेत्यांना लगावला.