बॅकलॉग विद्यार्थ्यांचा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ : उदय सामंत

पुणे : विद्यार्थी हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसाच निर्णय बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करू, असे सांगत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी बॅकलॉग विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला.
पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची काही विषय बॅकलॉग राहिले आहेत. त्यांची परीक्षा होणार की नाही, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात तातडीने राज्य शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत होती.
त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ट्विट करीत एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला. तसाच निर्णय एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत घेतला जाईल. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर केले जाईल. यासंदर्भात काही संभ्रम जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्याला बळी पडण्याची आवश्यकता नाही. बॅकलॉग विद्यार्थ्यांबाबत युद्धपातळीवर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.
ए टी के टी / बॅकलॉग च्या माझ्या विध्यार्थ्यानी चिंता करू नये आम्हाला आपली देखील काळजी आहे .. योग्यवेळी निर्णय जाहीर करू निर्णय तुमच्या हिताचाच असेल . pic.twitter.com/VUa2DMSUUL
— Uday Samant (@samant_uday) June 2, 2020
दरम्यान, उदय सामंत यांनी बॅकलॉग विद्यार्थ्यांना चिंता करू नये, आम्हाला देखील काळजी आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.





