साखर प्रति क्‍विंटल 3600 रुपये करा

सत्यशील शेरकर यांची मागणी : विघ्नहर कारखान्यात 34वे बॉयलर अग्निप्रदिपन थाटात

निवृत्तीनगर – सध्या साखरेचे बाजारभाव 3100 रुपयांच्या आसपास आहेत. परंतु साखरेचा उत्पादन खर्च 3400 ते 3500 च्या आसपास आहे. शासनाने साखरेची किमान विक्री किंमत 3 हजार 600 रुपये प्रती क्‍विंटल करणे गरजेचे आहे, अशी मागणी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली.

निवृत्तीनगर (ता. इंदापूर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 34व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भगवंत घोलप तसेच त्यांच्या पत्नी पुष्पाताई अशोक घोलप यांच्या हस्ते बुधवारी (दि.16) सकाळी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

शेरकर म्हणाले, सध्या साखरेचे बाजारभाव 3100 रुपयांच्या आसपास आहेत. परंतु साखरेचा उत्पादन खर्च 3400 ते 3500 च्या आसपास आहे. शासनाने साखरेची किमान विक्री किंमत 3 हजार 600 रुपये प्रती क्‍विंटल करणे गरजेचे आहे.
सध्या ऊस उत्पादकांच्यादृष्टीने अडचणीची बाब म्हणजे खोडवा व लागणीच्या उसाला हुमणी किडीचा प्रादुर्भाव होत होता. त्यासाठी विघ्नहर कारखाना ऊस विकास विभागामार्फत योग्य मार्गदर्शन करीत आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून भुंगेरे गोळा करण्यासाठी मोहिम राबविली. त्यामुळे हुमणीचा प्रार्दुभाव कमी झाला असून ऊसासह इतर पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे. स्व. शेठबाबा यांचा विचाराचा वारसा व आण्णांच्या मार्गदर्शनाच्या शिदोरीवर विघ्नहरच्या यशाचा रथ सदैवपणे पुढे नेत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सत्यशिल शेरकर म्हणाले की, 34 व्या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंत्री समितीच्या बैठकीनंतर गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख निश्‍चित होणार आहे. तथापि कारखान्याची गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा सुमारे 8 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. सभासद व ऊस उत्पादकांनी सर्व नोंदींचा व नोंद नसलेला बिगर नोंदीचा ऊस नोंद करून घेऊन विघ्नहरला गाळपासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

व्हाईस चेअरमन अशोक भगवंत घोलप म्हणाले की, विघ्नहर कारखान्याने उत्कृष्ट कारभार करीत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. विघ्नहरच्या यशामध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी, वाहतूक कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. आगामी गाळप हंगामातही विघ्नहर कारखान्याचा यशाची कमान चढतीच राहिल.

याप्रसंगी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, “जयहिंद’चे तात्यासाहेब गुंजाळ, नंदूकाका शेरकर, गणपत शेटे, पांडुरंग गाडगे, रवींद्र माळी, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, अजित परदेशी, हाजरा इनामदार, अर्चना भुजबळ, तान्हाजी बेनके, संभाजी पोखरकर, वल्लभ शेळके, जानकू डावखर, रामदास बोऱ्हाडे, गजानन हाडवळे, विजय भोर, विवेक काकडे, रामदास महाबरे, विघ्नहरचे सर्व आजी- माजी संचालक, पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायट्याचे चेअरमन, ऊस उत्पादक शेतकरी, शेती अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी स्वागत केले. यावेळी माजी संचालक रंगनाथ घोलप, शरद चौधरी आदींनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले. संचालक देवेंद्र खिलारी यांनी आभार मानले.

राष्ट्रीय पुरस्कार जुन्नरसाठी भूषणावह
विघ्नहर कारखान्यास यावर्षीही नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्‍टरीज, नवी दिल्ली यांच्याकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दलचा देशातील पहिल्या क्रमांकाचा सलग तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे. साखर धंद्यात अग्रगण्य असलेल्या भारतीय शुगर संस्थेकडूनही सर्वोत्कृष्ट ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार, असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. जुन्नर तालुक्‍याच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. या पुरस्कारांबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कामगारांचे शेरकर यांनी यावेळी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.