हडपसर : हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी भव्य बाईक रॅली काढली. पदयात्रेतून घरोघरी जाऊन भेटीगाठीचा धडाका लावलेल्या प्रशांत जगताप यांनी भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला. डॉ.अमोल कोल्हे यांच्या सहभागाने प्रचाराची उत्सुकता शिगेला पोहोचली.
डॉ. कोल्हे व उमेदवार प्रशांत जगताप यांनी हात उंचावत, तुतारी वाजवणारा माणूस दाखवत मतदारांना अभिवादन केले. या बाईक रॅलीमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर, मा.उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर, योगेश ससाणे, शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे, संदीप कोद्रे, पूजा कोद्रे, काँग्रेस हडपसर अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, अविनाश काळे, इम्रान शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “या संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे विकासाचे शिलेदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. महापौर, तसेच शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. हडपसरच्या विकासाचे व्हिजन त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे हडपसरकरांनी प्रशांत जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे. हडपसरचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर प्रशांतदादांसारखे नेतृत्व गरजेचे आहे. विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत काय दिवे लावले, हे आपण पाहिले आहे.
ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना आमदारकीची संधी दिली, त्यांच्याशी गद्दारी करून ते आज आपल्या विरोधात उभे आहेत. या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली असून, २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून प्रशांत जगताप यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन तुम्हा सर्व हडपसरवासियांना करतो.”
प्रशांत जगताप म्हणाले, “लोकसभेला डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यात तुम्ही सर्व हडपसरकरांनी मोठी साथ दिलीत. या वेळी विधानसभेलाही आपण सर्व त्याच ताकदीने पाठीशी आहात, हे पाहून आनंद वाटतो. हडपसरला एक सुंदर, सुसंस्कृत शहर घडविण्याचा माझा प्रयत्न आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी तुम्ही मला द्यावीत.
शरद पवारसाहेबांचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेऊन मला तुमच्यासाठी अनेक विकासकामे करायची आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांच्या एकत्रित प्रयत्नाने आणि मायबाप जनतेच्या मतदानरूपी आशीर्वादाने मला हडपसरचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास वाटतो.”