Indori Poha: मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड (Street Food) म्हटलं की इंदोरी पोह्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. इंदोर आणि भोपाळमध्ये अनेक लोक दिवसाची सुरुवात पोहे आणि जलेबी खाऊन करतात. हलके, चविष्ट आणि पटकन तयार होणारे पोहे आता घराघरात लोकप्रिय झाले आहेत. मात्र, इंदोरी पोह्यांची खास चव साध्या पोह्यांपेक्षा खूप वेगळी असते. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे खास ‘जिरावन मसाला’ आणि पोहे वाफेवर शिजवण्याची पद्धत. (Indori Poha) इंदोरी पोह्यांमध्ये कच्चा कांदा, शेंगदाणे, सेव, डाळिंब, हिरवी मिरची आणि थोडासा गोडसर स्वाद असतो. त्यामुळे हे पोहे खायला अतिशय टेस्टी लागतात. योग्य पद्धतीने बनवल्यास घरच्या घरीही अगदी बाजारासारखे इंदोरी पोहे तयार करता येतात. इंदोरी पोह्यांसाठी लागणारे साहित्य २ कप जाड पोहे कांदा शेंगदाणे कढीपत्ता हिरवी मिरची लिंबू डाळिंबाचे दाणे सेव हळद तेल जिरावन मसाल्यासाठी साहित्य बडीशेप जिरे धणे दालचिनी काळी मिरी लवंग तमालपत्र जायफळ सुंठ आमचूर पावडर काळं मीठ लाल तिखट हिंग साखर Indori Poha and Jeeravan Masala इंदोरी पोहे बनवण्याची पद्धत (Indori Poha) सर्वप्रथम पोहे चाळणीत घेऊन हलक्या पाण्याने धुवा. अतिरिक्त पाणी निघून जाईपर्यंत १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे पोहे मऊ होतील पण चिकट होणार नाहीत. यानंतर जिरावन मसाला तयार करण्यासाठी बडीशेप, जिरे, धणे, दालचिनी, काळी मिरी, लवंग, तमालपत्र आणि जायफळ हलके भाजून घ्या. हे सर्व मसाले मिक्सरमध्ये घालून त्यात आमचूर, काळं मीठ, तिखट, हिंग, सुंठ आणि साखर मिसळून बारीक पूड तयार करा. आता भिजवलेल्या पोह्यांमध्ये थोडी हळद घालून हलक्या हाताने मिक्स करा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, बडीशेप, हिरवी मिरची, हिंग आणि कढीपत्ता घाला. हे फोडणीचे मिश्रण पोह्यांवर टाका. यानंतर मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यावर पोह्यांची चाळणी ठेवा आणि पोहे वाफेवर शिजू द्या. या पद्धतीमुळे पोहे अधिक मऊ आणि चविष्ट होतात. शेवटी प्लेटमध्ये पोहे काढून त्यावर जिरावन मसाला, कांदा, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, सेव, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. गरमागरम इंदोरी पोहे तयार आहेत. इंदोरी पोह्यांची खासियत म्हणजे त्यांचा हलका गोड-तिखट-आंबट स्वाद आणि वरून घातलेली कुरकुरीत सेव. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम आणि पोटभर पर्याय मानला जातो.