नवी दिल्ली : मेक इन इंडिया ही चांगली संकल्पना होती. मात्र, त्याविषयीची योजना अयशस्वी ठरली. आताच्या मोदी सरकारप्रमाणेच आमच्या आधीच्या यूपीए सरकारांनाही बेरोजगारीची समस्या हाताळण्यात यश आले नाही, अशी प्रांजळ कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेचा प्रारंभ झाला. त्यावेळी बोलताना राहुल यांनी अभिभाषणात काही नवे नसल्याची टिप्पणी केली. देश म्हणून आपण उत्पादनावर फोकस करण्याची गरज आहे. आपण ती सर्व जबाबदारी चीनवर सोपवली आहे. सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) उत्पादन क्षेत्राचा वाटा २०१४ यावर्षी १५.३ टक्के इतका होता. आता तो घटून १२.६ टक्के झाला आहे. तो आजवरचा सर्वांत कमी वाटा आहे. उत्पादनाबाबत देशाचे रेकॉर्ड अतिशय निराशाजनक आहे. आपण देशात फोन बनवल्याचे सांगतो. प्रत्यक्षात त्यातील सर्व सुटे भाग चीनमध्ये बनलेले आहेत. आपण केवळ त्या सुट्या भागांची जुळणी करत आहोत. अनेक वस्तूंबाबत तशीच स्थिती आहे. एकप्रकारे आपण चीनला कर देत आहोत, असे भाष्य त्यांनी केले.