पुणे | साक्षर होण्यासाठी कलेशी मैत्री करा : डाॅ. आगाशे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षित होणे आणि साक्षर होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आज आपल्या समाजात सुशिक्षित निरक्षरांचे प्रमाण जास्त आढळते. तुम्हाला साक्षर व्हायचे असेल तर आयुष्यात किमान एकातरी कलेशी जरूर मैत्री करा, असा सल्ला ज्येष्ठ सिनेअभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे आयोजित साहित्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सिंबायाेसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्च्या संचालिका डॉ. श्वेता देशपांडे आदी उपस्थित होते.
आगाशे म्हणाले, तुम्ही परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता समर्पित करावी लागते आणि सर्व काही हे तुमच्या कामगिरीवर केंद्रित करावे लागते.
आजच्या तरुणांना आपल्या भावना नेमक्या काय आणि कशा आहेत, याची जाणीवही नाही. त्यांच्याकडे अनेक प्रकारची माहिती विपुल प्रमाणात आहे, परंतु अनुभवाची कमतरता आहे.
“घाशीराम कोतवाल’ या त्यांच्या प्रसिद्ध नाटकाबद्दल आगाशे म्हणाले, घाशीराम वादग्रस्त असल्यामुळे नव्हे तर त्याच्या वैश्विक स्वरूपामुळे लोकप्रिय झाला.
घाशीराम ही विजय तेंडुलकरांची कालातीत अशी निर्मिती आहे. हे नाटक अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाले. त्याच्या सार्वत्रिकतेमुळे त्याला जगात लोकप्रियता मिळाली.


