हडपसर – पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांसह हडपसर, महंमदवाडी, खराडी, वडगावशेरी, खडकवासला, सिंहगड रोड अशी पूर्व हवेलीची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवल्याचे शेवाळे यांनी सांगितले. यावेळी आमदार राहुल कूल यांचीही उपस्थिती होती.
“फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून शासनाने या गावांची नगरपालिका करण्याचे आदेश दिले. यापूर्वी ऑक्टोबर 2017 मध्ये 11 गावांचा व जून 2021 ला उर्वरित 23 गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आला. दरम्यान, या गावांत नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली. मात्र, येथून अवाजवी कर आकारून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची महापालिकेसोबत संघर्षाची भूमिका राहिली आहे. 1997 मध्ये पुणे महापालिकेत 36 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळीही काही गावे वगळली व पुन्हा 34 गावांचा समावेश केला. आता 34 पैकी फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे मनपातून वगळण्यात आली. त्यामुळे सध्या इतरही गावांमध्ये वातावरण तापले असून, आमच्याही गावांचा समावेश नगरपालिकेत करा किंवा महानगरपालिकेतून वगळा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेत समाविष्ट 34 गावे आणि अन्य गावे व पूर्व हवेलीतील काही गावे एकत्र करून पूर्व भागाची महापालिका स्थापन करावी. त्यामुळे मनपाचा ताण कमी होऊन या गावांचा नियोजनपूर्वक विकास साधला जाईल,’ असे शेवाळे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
लोकसंख्या व क्षेत्रफळाचा विचार करता पुणे राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. तुलनेत सदस्य संख्या खूपच कमी आहे. वाढता ताण पाहता पूर्व भागाची नवीन महापालिका करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आपण केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तसे निवेदन दिले आहे.त्यांनीही याविषयी अधिक माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगून फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
– राहुल शेवाळे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजप