पुणे – सर्व महाविद्यालये व संलग्न संस्थांनी त्यांच्या ग्रंथालयामध्ये तत्काळ ब्रेल लिपीतील पुस्तके, मासिके व इतर साहित्य येत्या दहा दिवसांत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व संलग्न संस्थांना याबाबतची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाविद्यालयांमध्ये शेकडो अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध नसल्याने त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये ब्रेल लिपीतील पुस्तके, मासिके व इतर साहित्यांचे स्वतंत्र दालन तयार करण्याच्या सूचना 31 जुलै 2018 रोजी यूजीसीने दिल्या होत्या. मात्र अद्यापही अनेक महाविद्यालयांनी याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी येत्या दहा दिवसात म्हणजे 9 एप्रिल पूर्वी याबाबतची कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल पाठवावा, असे परिपत्रक विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी काढले आहे.