Satara | २०२०-२१ ची थकीत ऊस बील वर्ग करून मकरंदआबांनी केली वचनपुर्ती

वाई, (प्रतिनिधी) – दि. १५/१०/२४ : वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमदार मकरंदआबा पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार १५ ऑक्टोंबरपर्यंत २०२०-२१ ची धकीत ऊस बील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार आज मंगळवार (दि. १५) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे ४० कोटी रूपये रक्कम रितसर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
त्यामुळे आता आपण खऱ्या अर्थाने म्हणु शकतो की, किसन वीर व शेतकऱ्यांना वाचविण्याची ताकत वाई-खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील यांच्यामध्येच आहे.
भविष्यात किसन वीर कारखान्याच्या शेतकऱ्यांना आमदार मकरंदआबा पाटील यांच्यावर अभिमान वाटेल, असेच काम यापुढील काळात करणार असल्याचे सुतोवातदेखील व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी याप्रसंगी काढले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना हा आपल्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, कोरेगांव या तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी.
या कारखान्यावर शेतकरी, कर्मचारी व त्यांच्याशी सलग्न असणाऱ्या संस्थामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चुकीच्या हातात कारखान्याची सुत्रे गेल्यानंतर काय काय यातना भोगाव्या लागतात, त्या किसन वीरच्या शेतकऱ्यांना व कामगारांना समजले आहे.
तसेच योग्य नेतृत्वाच्या हातात म्हणजे आमदार मकरंदआबा पाटील यांच्याकडे कारखान्याची सुत्रे गेल्यावर काय बदल होतो, ते आता आपण सर्वजण पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक स्व. किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी ही संस्था उभी करीत असताना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावुन रोजगार उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दर मिळाला पाहिजे,
वेळेवर ऊस गेला पाहिजे व कारखान्याचा नावलौकिक वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे हा उदात्त हेतु होता. किसन वीर कारखान्याची सुत्रे कार्यक्षेत्रातील मोठ मोठ्या दिग्गजांनी भुषवलेली होती.
त्यामध्ये किसन वीर, डी. बी. कदम, लालसिंगराव शिंदे, नामदेवराव कदम, सुरेश वीर, लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या काळात शेतकऱ्यांनी सुगीचे दिवस पाहिलेले होते.
दरम्यान मागील संचालक मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सत्ता गेली आणि कारखान्याची अधोगतीला सुरूवात झाली.
मागील संचालक मंडळाने कारखान्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून अनागोंदी कारभार केल्यामुळे परिणामी बँका, शेतकरी व कामगार तसेच इतरही संस्था, तोडणी वाहतुकदार, माल पुरवठादार यांची प्रचंड देणी थकविली गेली.
त्यामुळे कारखान्यावर सुमारे १ हजार कोटींचे कर्ज झालेले होते. कारखाना बंद पडण्याचा स्थितीत होता. ऊस बीलाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी व कामगार हतबल झालेला होता. कारखान्याची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली होती.
अशा परिस्थितीमध्ये शेतकरी व कामगार वर्गाने मोठ्या आशेने आमदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्याकडे कारखान्याबाबत आग्रह धरून निवडणुक लढविण्यास सांगितले.
मकरंदआबांनीदेखील केवळ शेतकरी, कामगार यांचे हाकेला प्रतिसाद देऊन सामाजिक जाणीवेतून आपली राजकीय कारकिर्द पणाला लावुन शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव व हितासाठी ही निवडणुक लढविली व ऐतिहासिक विजय मिळवित कारखाना ताब्यात घेतला.
कारखान्याची सुत्रे हातात घेतल्यानंतर वास्तविक परिस्थिती खुप भयानक व विचित्र होती. शेतकऱ्यांनी भाग भांडवलापोटी दिलेल्या रक्कमेतुन आपण कारखाना सुरू केला व दोन हंगाम यशस्वी करून केलेले होते.
परंतु, खऱ्या अथनि जर कारखाना वाचवायचा असेल तर यासाठी भरीव निधी मिळणे गरजेचे होते हे मकरंदआबा जाणुन होते व त्यासाठी मकरंदआबांनी आपली राजकीय कारकिर्द पणाला लावत फक्त सामान्य शेतकरी व कारखाना वाचविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. प्रथम कारखाने वाचले पाहिजे या उदात्त हेतुने त्यांनी मंत्रीपदाची ऑफर देखील धुडकावली.
केंद्रिय सहकार मंत्री ना. अमितजी शहा, मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष प्रयत्नातुन कारखान्याला ४६७ कोटी रूपयांची थकहमी मंजुर झाली.
सन २०२०-२१ मधील थकीत बील ५४ कोटी रूपये होती. त्यातील जवळपास रूपये १० कोटी इतकी रक्कम नुतन संचालक मंडळाच्या कालावधीत यापुर्वीच आदा करण्यात आलेली आहे.
किसन वीर कारखान्याला पुर्वीचे दिवस आणुन दाखविल्याशिवाय आता गप्प बसणार नसल्याचा चंग मकरंदआबांनी बांधल्याचे दिसून येत आहे. त्याचे पहिले पाऊल उचलले असून आज शेतकऱ्यांच्या खात्यात सन २०२०-२१ मधील ऊस बीलाची रक्कम रूपये ४० कोटी वर्ग करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना सन २०२०-२१ ची बीले मिळण्याची शक्यता धुसर असताना बुडालेले पैसे आज मकरंदआबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने वर्ग केल्याने आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. येणाऱ्या गळीत हंगामातही आपला कारखाना ऊस दरामध्ये कदापीही मागे पडणार नाही.
बँकांचे वित्तसहाय्य न घेता आपण इतर कारखान्यांप्रमाणे दर दिलेला आहे. आतातर आपल्याला बँका वित्तसहाय्य करणार असून यापुढील काळात कारखान्याच्या बीलांना विलंब होणार नसुन ती वेळेवरच देणार असल्याचेही सांगितले.
शेतकऱ्यांनीही आता क्षणिक अमिषाला बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्यालाच घालुन कारखाना वाचविण्याच्यासाठी आमदार मकरंदआबांना साथ देण्याचे आवाहनही प्रमोद शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.
शेतकऱ्यांना दिलेल्या वचनपुर्तीचा आनंद अविस्मरणीय – चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील
किसन वीर कारखान्याची सुत्रे ताब्यात घेतल्यापासुन जोपर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दातुन आपण मोकळे होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसुन चालणार नाही. ही थकहमीची रक्कम मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते.
त्या प्रयत्नांनाही ना. अजितदादांच्या विशेष प्रयत्नामुळे यश मिळाले व थकहमीची रक्कम मंजुर झाली व खात्यात आली. सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील देणार असल्याचे वचन मी माझ्या शेतकऱ्यांना दिलेले होते.
त्यानुसार आज १५ ऑक्टोंबरलाच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करीत असल्याने वचनपुर्तीचा आनंद होत असून हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असून या बीलामुळे शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी केली असल्याची भावना आमदार मकरंदआबा पाटील यांनी बोलून दाखविली.
सन २०२०-२१ ची बीलाची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी केला पेढे वाटुन आनंद साजरा
मागील संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे कारखाना अधोगतीला जाऊन पर्यायाने शेतकरी व कामगार वर्ग अडचणीत आलेला होता. सन २०२०-२१ ची ५४ कोटी रूपयांची ऊसाची बीले देय्य होती.
आमदार मकरंदआबा व खासदार नितीनकाका पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार आज आमच्या खात्यावर बील वर्ग केल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत असून हा आनंद आम्ही पेढे वाटून साजरा करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

