Satara : बोपेगावकरांमुळेच मंत्रिपदापर्यतच झेप

वाई : माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बोपेगावच्या सरपंचपदापासून झाली. बोपेगावकरांनी विश्वास टाकल्यानेच पुढे संधी मिळत गेली व आज मंत्रिपदापर्यंत झेप घेऊ शकलो, असे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.
माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांच्या ८७ व्या जयंती व ना. मकरंद पाटील मंत्री झाल्याबद्दल बोपेगाव ग्रामस्थांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रताप पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे, माजी अध्यक्ष उदय कबुले, किसन वीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, राजेंद्र तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय देसाई, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष महादेव मस्कर, शशिकांत पवार, संदीप चव्हाण तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मकरंद पाटील म्हणाले, ‘‘माझे बोपेगावातील भाषण कधीच पूर्ण झाले नाही. बोपेगावात भाषण करीत असताना कंठ दाटून येतो एवढे प्रेम बोपेगावकरांनी माझ्यावर केले. सरपंच असताना ग्रामस्वच्छता अभियानात संक्रातीच्या आदल्या रात्री बोपेगावातील मातांनी दोन ट्राँली शेणाने संपूर्ण बोपेगावातील्र रस्ते सारविले. सर्वांनी परिश्रम घेतले म्हणून अभियानात बक्षीस मिळाले व त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष माझ्याकडे वेधले गेले. माझ्या परस्पर कवठे जिल्हा परिषद गटाचे तिकीट मला देण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले व जिल्हा परिषद सदस्य झालो. पहिल्यांदा आमदारकीला पराभव झाला पण त्याने खचून न जाता निकालाच्या दुस-याच दिवशी त्या निवडणुकीत मला १०० टक्के मतदान केलेल्या किरुंडे गावाला भेट दिली व पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो म्हणूनच चौथ्यांदा तुम्ही मला आमदार केलेत.’’
बाळासाहेब सोळस्कर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून काम करताना तात्यांनी शरद पवार यांच्या पाठीशी जिल्हा एकसंघ उभा केला. कै. तात्यांची राजकीय वाटचाल जपण्याचे व त्यावर चालण्याचे काम मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी केले आहे. नितीन भरगुडे पाटील म्हणाले, तात्यांची इच्छापूर्ती खासदार नितीन पाटील यांनी राज्यसभा खासदार होऊन तर आबांनी मंत्री होऊन पूर्ण केली. मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री झाल्यावर कामाचा व्याप जरी वाढला तरी तुम्ही मतदारसंघाला काहीही कमी पडू देणार नाही याची खात्री आहे. विठ्ठल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.





