मकरंद पाटील मुंबईतील बैठकीला अनुपस्थित

सातारा – वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील दोन दिवसांपूर्वी झालेल्या शरद पवार यांच्या दौऱ्यात पवार यांच्या गाडीत होते. मात्र, बुधवारी मुंबई येथे शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीस आ. पाटील अनुपस्थित राहिले.
शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र मकरंद पाटील पवार यांच्या अडचणीच्या काळात बोलावलेल्या बैठकीस अनुपस्थित राहिले. शरद पवार अथवा अजित पवार यापैकी कोणत्याही बैठकीला उपस्थित न राहता श्री. पाटील तटस्थ राहिल्याची चर्चा सुरु होती. मात्र, पूर्वीच्या अपॉंइंटमेंटनुसार आज वैद्यकीय कारणास्तव मुंबईला जाता आले नाही, असे श्री. मकरंद पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांनी मुंबई येथे शपथविधीपूर्वी बोलावलेल्या बैठकीस आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांच्यासमवेत आ. मकरंद पाटील यांची उपस्थिती होती. याच बैठकीनंतर राष्ट्रवादीत बंडाळी होवून अजित पवार यांनी समर्थकांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे याचदिवशी झालेल्या अजित पवार व सहकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्यास आ. मकरंद पाटील उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खा. शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात शिरवळपासून शरद पवार यांच्या गाडीत मकरंद पाटील होते. कराड, सातारा व त्यानंतर मातंग परिषदेस शरद पवार यांच्याबरोबर श्री. पाटील उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार यांनी बुधवारी मुंबई येथे बोलावलेल्या बैठकीस श्री. पाटील उपस्थित राहणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, बुधवारी शरद पवार अथवा अजित पवार यापैकी कोणाच्याही बैठकीला मकरंद पाटील उपस्थित नव्हते.
शरद पवार व अजित पवार या दोघांशीही आ. मकरंद पाटील यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी सर्वप्रथम शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला होता. शरद पवार व पाटील घराण्याची नेहमीच जवळीक राहिली आहे. त्यामुळे अडचणीत काळात शरद पवार यांच्याबरोबर मकरंद पाटील ठाम राहतील, असा अंदाज होता. मात्र, मकरंद पाटील अनुपस्थित राहिल्याने चर्चा सुरु झाली आहे.
काही दिवसात युरोप दौऱ्यावर जायचे असल्याने त्या अनुषंगाने बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी पूर्वीच अपॉइंटमेंट घेण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीस उपस्थित राहता आले नाही. मेडिकल चेकअप महत्वाचे असल्याने त्याला प्राधान्य दिले.
आ. मकरंद पाटील





