कुर्डूतील मुरूम उपसा प्रकरणी मोठी अपडेट; तहसीलदारांच्या अहवालात उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका

Kurdu Murum Case : राज्यात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणामुळे कुर्डू हे गाव चांगलेच चर्चेत आलं आहे. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहवाल मागविला असल्याचं म्हटलं होतं. आता माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी तीन पानी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. या अहवालात कुर्डूतील मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अहवालात काय?
माढ्याच्या तहसीलदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या अहवालात घटना आणि करण्यात आलेली कारवाई याबाबत माहिती देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला कुर्डूचे ग्राम महसूल अधिकारी गाव हद्दीतील गट क्रं. ५७५/ १ या जमिनीत सुरू असलेल्या मुरूम उपशाची चौकशी व पाहणीसाठी गेले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कारवाई दरम्यान सरकारी कामात अडथळा आणला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच तेथील पंचनाम्यात ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरूम उत्खनन केल्याचे आढळले असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई
या प्रकरणी संबंधित वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी कुर्डू येथे मुरूम उपसा करताना २ जेसीबी व टिप्परवर सापडले होते. या वाहनाच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ग्रामपंचायतीवर देखील 5 लाख 47 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कुर्डू बंदची हाक
कुर्डू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुर्डू बंदची हाक देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे आता गावकरी एकत्र आले असून आज गाव बंदीची हाक देण्यात आली आहे.
हेही वाचा : “सोशल मीडियावर पैसे देऊन माझ्याविरुद्ध मोहीम चालवताय…” ; नितीन गडकरींचे खळबळजनक वक्तव्य





