Tiger Shroff Attack Case : टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट! राधा-बबिताच्या एन्ट्री, धक्कादायक माहिती उघड
Tiger Shroff Attack Case : या दोघी दिल्लीहून पिस्तूल घेऊन मुंबईत आल्या होत्या आणि संबंधित आरोपींकडे शस्त्र पोहोचवल्यानंतर पुन्हा दिल्लीला परतल्या होत्या.

Tiger Shroff Attack Case : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता राधा आणि बबिता या दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.
या दोघी दिल्लीहून पिस्तूल घेऊन मुंबईत आल्या होत्या आणि संबंधित आरोपींकडे शस्त्र पोहोचवल्यानंतर पुन्हा दिल्लीला परतल्या होत्या. सध्या पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जामिनावर बाहेर आलेल्या कुणालची अनिल पंडितशी ओळख
पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणातील कुणाल नावाचा आरोपी नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्राच्या माध्यमातून त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून संपर्क सुरू होता.
अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि २० काडतुसे मिळवली. यावेळी सुमितही त्याच्यासोबत अमृतसरला गेला होता. दरम्यान, सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. त्याने राधाला आपल्या कारवायांची माहिती दिली आणि तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर राधाला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यासाठी तयार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
दिल्लीहून मुंबईपर्यंत शस्त्र पोहोचवण्याची जबाबदारी
१५ ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घेऊन गेला. यावेळी पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आलं होतं. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून अनिल पंडितच्या संपर्कात होता आणि त्याच्या सूचनांनुसार पुढील हालचाली करत होता.
१७ ऑक्टोबर रोजी राधा आणि बबिता मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर उतरल्या. त्यानंतर दोघींनी दादर परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्याच दिवशी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतली.
गोळीबारानंतर आरोपींच्या सुटकेसाठी हालचाली
१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात अभिनेता सुदैवाने बचावला. मात्र, या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
गोळीबारानंतर अनिल पंडितने कुणालला मुंबईत अडकलेल्या शूटर्सच्या सुटकेची व्यवस्था करण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजीच राधा आणि बबिता दादर येथून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या.
यानंतर २० ऑक्टोबर रोजी या दोघींना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. आता या प्रकरणात शस्त्र घेण्यासाठी बॅग स्वीकारणारा अल्पवयीन मुलगा नेमका कोण होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याच्याकडून या हल्ल्याच्या नियोजनाबाबत आणि आरोपींच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडमध्ये खळबळ; तपासाकडे सर्वांचं लक्ष
टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. राधा आणि बबिता यांच्या अटकेनंतर गोळीबारामागील पडद्यामागचा सूत्रधार कोण याबाबतची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





