India -Chile trade agreement : भारत आणि चिलीदरम्यान मुक्त व्यापार कराराची बोलणी लवकरच संपणार आहेत. त्यामुळे भारताला दुर्मिळ खनिजे म्हणजे रेअर अर्थ मेटल उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. लॅटिन अमेरिकेतील चिली या देशांमध्ये दुर्मिळ खनिजाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. या खनिजाचा वापर करण्याची क्षमता या देशाकडे नाही. भारत या कामी चिलीला मदत करणार आहे. या बाबीचा दोन्ही देशादरम्यान होत असलेल्या मुक्त व्यापार करारामध्ये समावेश केला जात आहे. भारताने अनेक विकसित देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. त्याचबरोबर भारत आपल्या व्यापाराला उपयोगी पडणार्या इतर विकसनशील देशाबरोबर व्यापार करार करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे गोयल यांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत बोलताना सांगितले. चिली देशाबरोबर 2006 मध्ये प्राथमिक स्वरूपाचा व्यापार करार झाला आहे. आता या कराराची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या संदर्भातील बोलणी अंतिम टप्प्यात आहे. सध्या दोन्ही देशादरम्यानचा एकत्रित व्यापार तीन अब्ज डॉलरपर्यंत आहे.या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गोयल म्हणाले की युरोपातील 27 देशाबरोबर एकत्रित व्यापार करार झाल्यामुळे आता इतर देशाबरोबर भारताला व्यापार करार करताना अडचणी येणार नाहीत. भारताने चालू आर्थिक वर्षांमध्ये एक हजार अब्ज डॉलरचा व्यापार करण्याचे ठरविले आहे आणि हे उद्दिष्ट सहज साध्य होईल असे ते म्हणाले. हेही वाचा – Budget 2026: शेअर बाजारात येणार मोठी तेजी? गेल्या 15 वर्षांचा इतिहास देतोय ‘हे’ संकेत!