प्रभात वृत्तसेवा खालापूर – खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठा आणि खळबळजनक खुलासा केला आहे. मंगेश काळोखे यांची हत्या २० लाख रुपयांच्या सुपारीतून करण्यात आली असून या कटामागे पुणे कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा मुख्य सूत्रधार रविंद्र देवकर असून त्याने इशा पापा शेख हिच्यामार्फत मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी आणि आणखी एक फरार आरोपी यांना मिळून तब्बल २० लाख रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातून आखण्यात आला होता हत्या कट पोलीस तपासात ही हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी अनेक दिवस मंगेश काळोखे यांची रेकी केली होती. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे संपूर्ण कट उघडकीस आला आहे. सुपारी घेणारा एक मारेकरी पुण्यात सापडला असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर तपासाला मोठी दिशा मिळाली आहे. आतापर्यंत १२ आरोपी अटकेत, एक फरार या प्रकरणात आतापर्यंत रविंद्र देवकर, त्याचा मुलगा दर्शन देवकर व धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर, इशा पापा शेख, आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी, सचिन चव्हाण यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या हत्येमागे जुने वैमनस्य आणि निवडणुकीतील पराभवाचा राग कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तपास अंतिम टप्प्यात असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.