US government shutdown – अमेरिकेत लागू असलेल्या शटडाऊनच्या परिणामामुळे अमेरिकेतून होणाऱ्या विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. फेडरल एव्हिएशन एजन्सीने याबाबतची घोषणा आज केली. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे आता देशांतर्गत लांब पल्ल्याचे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पर्यायी विमान उड्डाणांची व्यवस्था शोधावी लागणार आहे. फेडरल एव्हिएशन एजन्सीने दोन डझन प्रांतांमधील देशांतर्गत विमान प्रवासासाठीच्या ४० विमानतळांची यादी निवडली आहे. यामध्ये ऍटलांटा, डल्लास, डेनवर, लॉस एंजेलिस आणि चार्लोट नॉर्थ कॅरोलिना आदी प्रांतांमधील विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय न्यूयॉर्क, ह्यूस्टन, शिकागो आणि वॉशिंग्टनसह काही महानगरीय भागातील अनेक विमानतळांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. याशिवाय काही छोट्या विमानतळांवरील सेवाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी विमान उड्डाणे रद्द व्हायला सुरुवात झाल्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाणांचे वेळापत्रक बिघडले. आपल्याला नियोजित वेळापत्रकानुसार विमान प्रवास करता येऊ शकेल का नाही, हे न समजल्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवरच ताटकळत थांबल्याचे चित्र दिसत होते. सध्या एकूण ६ हजार विमानांची उड्डाणे होत असून नवीन आदेशांनुसार २२० विमानांची उड्डाणे या आठवड्यात रद्द झाली आहेत, असे अमेरिकन एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर डेल्टा एअरलाईन्सने १७० उड्डाणे रद्द केली. देशभरातील ८५१ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे विमान वेळापत्रकाविषयीच्या निरीक्षक संस्थेने म्हटले आहे. शटडाऊनमुळे विमानतळांवरील कर्मचाऱ्यांना विनावेतन काम करावे लागते आहे. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने विमान उड्डाणांमध्ये कपात करण्यात आल्याचे फेडरल एव्हिएशन एजन्सीने म्हटले आहे.