शिरूर : तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापून दामूआण्णा घोडे यांना संधी देण्यात आल्याने गावडे घराण्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या गावडे कुटुंबाला डावलल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा परिषदेसाठी हा गट सर्वसाधारण झाल्यापासून राजेंद्र गावडे यांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी राष्ट्रवादीला साथ देत दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अचानक राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादी (शप) पक्षाकडून इच्छुक असलेल्या टाकळी हाजीच्या माजी सरपंचांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्याने गावडे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे राजेंद्र गावडे यांची आठ वर्षांची मेहनत आणि जनसंपर्क दुर्लक्षित झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. कार्यकर्त्यांचा सन्मान सर्वोच्च असून, लवकरच पुढची भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पोपटराव गावडे यांनी मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचे आणि भाजप सत्तेत असल्याचे विधान केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावली आहे. त्यांचे विश्वासू सहकारी आर. बी. गावडे यांनी तर थेट भाजपचा झेंडा घेऊनच उमेदवारी अर्ज भरण्यास जाणार असल्याचे जाहीर केले आहे. राजेंद्र गावडे यांनीही निष्ठेने काम करूनही अन्याय झाल्याची खंत व्यक्त करत जनतेसाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बंडाळीमुळे कवठे येमाई-टाकळी हाजी गटातील निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार आहे.