प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. चिखली, शिरगाव आणि चाकण परिसरात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे सात लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाया शनिवारी (दि. १० जानेवारी) करण्यात आल्या.या कारवायांमध्ये संतोष मारुती पवार (वय ३०, रा. चिखली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर शिरगाव आणि दारुंबरे येथील पवना नदीकाठी हातभट्ट्या चालवणाऱ्या दोन महिला आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाल्या. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. यासोबतच भीमा नदीकाठी हातभट्टी लावणारा गोपाळ चेतन मन्नावत (रा. भिवरेवाडी, कोयाळी, ता. मावळ, जि. पुणे) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील स्पाइन रोडवर चोरून दारू विक्री करणाऱ्या संतोष पवारकडून एक लाख ७१ हजार रुपयांचा साठा जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. शिरगाव आणि दारुंबरे येथे पवना नदीच्या पात्रात गावठी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले. तसेच चाकण हद्दीतील कोयाळी येथे भीमा नदीकाठी एक लाख रुपयांचे रसायन जप्त करण्यात आले. चाकण पोली याबाबत अधिक तपास करीत आहेत.