न्यूयॉर्कमध्ये ‘बर्फा’चे वादळ; सर्वत्र बर्फाचे ढिग

न्यूयॉर्क – न्यूयॉर्कच्या ईशान्यभागाला आज बर्फाचे वादळ धडकले. या बर्फाच्या वादळामुळे न्यूयॉर्कमध्ये तब्बल एक फुटापेक्षा अधिक बर्फ साचले आहे. सर्वत्र बर्फाचे ढिगच्या ढिग साचले असल्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे.
अटलंटिक किनारपट्टीच्या मध्यभागापासून या बर्फाच्या वादळाची तीव्रता वाढत चालली आहे. हे वादळ खूपच संथगतीने पुढे सरकत असून मंगळवारीही याची तीव्रता अधिक कायम राहिल. तसेच वारे आणि बर्फवृष्टीची तीव्रताही कायम राहिल, असे राष्ट्रीय हवामान संस्थेतील हवामानशास्त्रज्ञ लारा पगानो यांनी सांगितले. संपूर्ण पेनसिल्वेनिया आणि न्यूयॉर्कच्या दक्षिणेकडील काही भागात, कनेक्टिकट आणि न्यूजर्सीच्याही बहुतांश भागात हे बर्फाचे वादळ कायम असेल, असा इशाराही पगानो यांनी दिला आहे.
सोमवारी सकाळी 3 ते 5 इंच बर्फाचे थर रस्त्यांवर साचले होते. पेनसिल्वेनियामध्येही 6 इंच बर्फाचे थर साचले होते. बर्फाच्या वादळामुळे न्यूजर्सीमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गव्हर्नर फिल मर्फी यांनी आवश्यक उपाय योजनांचे आदेशही दिले आहेत.
अनावश्यक कामांसाठी सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. न्यूजर्सीमधील 6 प्रमुख ठिकाणे करोना लसीकरणासाठी यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. न्यूयॉर्कमधील सोमवारचे लसीकरण सोमवारी रद्द करावे लागले आहे.





