NDPS Operation : सरत्या वर्षात एनडीपीएसची मोठी कारवाई; 2 कोटी 60 लाखांच्या मुद्देमाल जप्तीसह 112 आरोपींना अटक

नागपूर : अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यातंर्गत येथील अंमलीपदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करीत २ कोटी ६० लाख ७२ हजार ३८५ रूपयांच्या मुद्देमालासह ११२ आरोपींना अटक केली आहे. मुद्देमालासोबत जप्त केलेले मोबाईल, गाडी असे इतर साहित्य पकडून ५ कोटी ४१ लाख ७२ हजार रूपयांचा माल जप्त केल्याचे अहवालात नमुद केले आहे.
एनडीपीएसच्या वार्षिक अहवालात एकूण ५२ प्रकरणे दाखल करण्यात आली. तर २४१ किलो ७०१ ग्रॅमचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ताज्या कारवाईत कुख्यात गॅगस्टर सुमित चिंतलवार, मीर मिश्रा, मोनू मिश्रा व इतर साथीदारांना क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस पथकाने ५० लाखांपेक्षा एमडीसह पकडले. १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत ४५ लाख २४ हजार रूपयांचा २३९ किलो गांजा जप्त केला.
तसेच ४८ आरोपींना अटक करण्यात आली. १ लाख ७५ हजार रूपयांचे ७५ ग्रॅम चरस, २ कोटी १३ लाख ९३ हजार ३०० रूपयांचे २ किलो मेफेड्रोन जप्त करण्यासोबत ४४ आरोपी अटकेत आहे. ६ लाख ८४ हजार रूपयांचा मांजा, कॉपी राईट अॅक्ट अंतर्गत २ कोटी ०४ लाख ०७ हजार रूपयांची कारवाई करीत ६ आरोपींना अटक केली. १ ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत ७ प्रकरणांत ११ लाख १४ हजार ६८० रूपयांचे २६ किलो २९३ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. तर २७ आरोपींना अटक केली आहे.





