Eknath Shinde : मोठी घडामोड! ठाकरेंचे 14 आमदार फुटणार असल्याची चर्चा; आता एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
Eknath Shinde : ठाकरे गटातील २० पैकी तब्बल १४ आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील २० पैकी तब्बल १४ आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असून या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या अनुपस्थितीनंतर त्यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज दुपारी दोन वाजल्यानंतर दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा सुरू असताना त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याशिवाय उद्या बुधवारी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे.
आता पुढील सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पूर्वसंध्येलाच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत असल्याने या दौऱ्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दिल्ली दौऱ्यात शिंदे केंद्रातील कोणत्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतात, तसेच या प्रकरणाशी संबंधित वकिलांशी चर्चा करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे ठाकरे गटातील आमदारांबाबत सुरू असलेल्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा आणि सर्वोच्च न्यायालयातील उद्याची सुनावणी यामुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दौऱ्यानंतर राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये नेमके कोणते बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






