टाकवे बुद्रुक – आंदर मावळ परिसराला बुधवारी रात्री विजांचा कडकडाट, सोसाट्याचा जोरदार वाऱ्यासह परतीच्या पावसाने चांगले झोडपले आहे. त्यामुळे भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. या परिसरात हॅब्रेट, नाचणी, वरई, भातपीक भुईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरात भात हे मुख्य पीक असून, पावसामुळे भातपिकांची काढणी खोळंबली आहे. काही शेतकऱ्यांनी विद्युत पंपाच्या साह्याने पाणी उचलून व मंजूर मिळावे या हेतूने लवकर भातपेरणी केली. परंतु हातातोंडाशी आलेले भातपीक मात्र पावसाने हिरावून घेतले आहे. या वर्षी भातपिकासाठी पोषक व गरजेनुसार पाऊस पडत गेल्याने भातपीक जोमदार आले होते. तसेच भातपिकांवर कोणतीही रोगराई नसल्याने भात उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु परतीच्या पावसाने चार दिवसांत होत्याचे नव्हते करून ठेवल्याने शेतकरी चिंतेत आहे. पाऊस रोज हजेरी लावत असून भात खाचरे पुन्हा पाण्याने तुडुंब भरून वाहताना दिसून येत आहेत. या परतीच्या पावसात कोळंब, सुरती कोळंब, हाळी भात या सारख्या जातीची भातपीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत आहे. नुकसान झालेल्या भातपिकाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, आशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.