iPhone 18 Pro: Apple च्या आगामी iPhone 18 सीरीज लाँचिंगला अजून बराच अवधी असला, तरी टेक जगतात आतापासूनच ‘iPhone 18 Pro’ आणि ‘iPhone 18 Pro Max’ बाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ताज्या लीक्सनुसार, ॲपल आगामी काळात आपल्या डिझाइन आणि तंत्रज्ञानात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेषतः फोनचा डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअप सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. डिस्प्लेमधून ‘डायनॅमिक आयलंड’ गायब होणार? सर्वात मोठी चर्चा ही iPhone 18 Pro च्या फ्रंट डिझाइनबाबत आहे. रिपोर्ट्सनुसार, ॲपल ‘फेस आयडी’चे (Face ID) सर्व सेन्सर्स डिस्प्लेच्या खाली लपवण्याच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर हे यशस्वी झाले, तर आयफोनमधील सध्याचे ‘डायनॅमिक आयलंड’ पूर्णपणे गायब होऊ शकते. सेल्फी कॅमेऱ्यासाठी अँड्रॉइड फोन्सप्रमाणे एक छोटा ‘होल-पंच’ कटआउट दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युजर्सना अधिक मोठा आणि विना अडथळा डिस्प्ले अनुभवता येईल. कॅमेऱ्यात ‘मेकॅनिकल आयरिस’चे पदार्पण – फोटोग्राफी प्रेमींसाठी iPhone 18 Pro सीरीज खास ठरणार आहे. ॲपल सध्या किमान एका रिअर कॅमेऱ्यासाठी ‘मेकॅनिकल आयरिस’ची चाचणी घेत असल्याचे समजते. सध्याच्या आयफोनमध्ये ‘फिक्स्ड अपर्चर’ असते, मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे युजर्सना प्रकाशाच्या तीव्रतेनुसार अपर्चर नियंत्रित करता येईल. यामुळे कमी प्रकाशात (Low Light) उत्कृष्ट फोटो आणि बॅकग्राउंडमध्ये नैसर्गिक ‘ब्लर’ इफेक्ट मिळण्यास मदत होईल. शक्तिशाली A20 प्रो चिपसेट – कार्यक्षमतेच्या बाबतीत, या मॉडेल्समध्ये Apple ची आगामी A20 प्रो चिपसेट असेल. ही चिप TSMC च्या अत्याधुनिक 2nm प्रोसेसवर आधारित असण्याची शक्यता आहे. यामुळे फोनची गती तर वाढेलच, पण बॅटरीचा वापरही लक्षणीयरीत्या कमी होईल. ॲपल नवीन चिप पॅकेजिंग तंत्रज्ञानावरही काम करत आहे, ज्यामुळे गेमिंग आणि व्हिडिओ एडिटिंगसारखी अवघड कामे अधिक सुलभ होतील. कधी होणार लाँच आणि काय असेल किंमत? मिळालेल्या माहितीनुसार, Apple सप्टेंबर २०२६ मध्ये iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि iPhone Air 2 लाँच करू शकते. तर, रेग्युलर iPhone 18 आणि बजेट फ्रेंडली iPhone 18e हे २०२७ च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतात. संभाव्य किंमत (भारतीय बाजारपेठ): iPhone 18 Pro: ₹१,३४,९०० पासून सुरू. iPhone 18 Pro Max: ₹१,४९,९०० पासून सुरू.