ठाणे – समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही दुर्घटना घडली. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जण जखमी झाले आहेत. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या व्ही. एस. एल. कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात शहापूर पोलीस स्थानकात कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत- महाराष्ट्रातील शहापूर इथं झालेली भीषण दुर्घटना अतिशय दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांनी श्रध्दांजली अर्पण केली. अपघातातील जखमींना लवकर आराम मिळावा ही प्राथर्ना. घटनास्थळी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी काम करत आहे. बाधितांना योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.