चीनमध्ये मोठी दुर्घटना, ‘शॉपिंग मॉलला भीषण आग’;16 जणांचा होरपळून ‘मृत्यू’

China । चीनमध्ये बुधवारी (17 जुलै) एक मोठी दुर्घटना घडली. चीनच्या झिगोंग शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या सरकारी मीडियानुसार, सिचुआन प्रांतातील झिगोंग शहरात एका 14 मजली इमारतीला आग लागली. त्यामुळे अनेक लोक इमारतीत अडकले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये इमारतीतून काळा धूर निघताना दिसत आहे.
सरकारी मीडिया सीसीटीव्हीनुसार, आगीची माहिती मिळताच 300 आपत्कालीन कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य केले आणि इमारतीच्या आगीतून सुमारे 30 लोकांना वाचवले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, ‘आगीचे कारण बांधकामाचे काम असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, त्यामुळे ठिणगी पडली आणि नंतर आग लागली. मात्र, अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही.’
China । अपघातामागील कारण शोधण्याच्या सूचना प्राप्त झाल्या…
चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात बचाव कर्मचारी आणि प्रांतीय अधिकाऱ्यांना आगीचे कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितले. तसेच या अपघातातून धडा घ्या, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. चीनमध्ये असे अपघात अगदी सामान्य झाले आहे. यापूर्वी इमारतींना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहे, ज्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. इमारती बांधताना नियमांचे पालन न करणे हे आगीचे प्रमुख कारण आहे.
China । आगीचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये इमारतीतून ज्वाळा उठताना दिसत आहे. काळा धूरही बाहेर पडत आहे, जो लांबून दिसत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी केवळ पाईपची मदत घेतली नाही, तर ड्रोनच्या माध्यमातून आग विझवण्याचे कामही करण्यात आले. झिगॉन्ग शहरातील ज्या मॉलमध्ये आग लागली त्या मॉलमध्ये डिपार्टमेंटल स्टोअर्स, रेस्टॉरंट्स आणि चित्रपटगृहे तसेच अनेक कंपन्यांची कार्यालये होती.
China । आगीच्या घटनांमध्ये 19 टक्के वाढ
चीनमध्ये आगीच्या घटना अगदी सामान्य झाल्या आहेत. राष्ट्रीय अग्निशमन आणि बचाव प्रशासनाचे प्रवक्ते ली वानफेंग यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 20 मे पर्यंत गोळा केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 947 आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास आगीच्या घटनांमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटसारख्या सार्वजनिक ठिकाणी आग लागण्याच्या घटनांमध्ये 40% वाढ झाल्याचे ली वानफेंग म्हणाले. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे वीज किंवा गॅस लाईन्समधील खराबी आणि निष्काळजीपणा आहे असेही ली वानफेंग यांनी सांगितले.





