जागतिक व्यासपीठावर नशीब आजमावण्याचा “महिंद्रा’चा प्रयत्न

पुणे – महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने संशोधन आणि विकासावर भर देऊन गेल्या दशकात प्रवासी वाहन विक्रीत चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत नाव मिळविल्यानंतर आता ही कंपनी जागतिक व्यासपीठावर आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महिंद्रा कंपनीचे काही देशांमध्ये वितरकांचे नेटवर्क आह.े या नेटवर्कचा वापर करून सुरुवातीला या देशात महिंद्रा वाहनांची विक्री वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नंतर टप्प्याटप्प्याने इतर देशात महिंद्राची वाहने विकण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ते म्हणाले की, आमची पिकअप वाहने आणि नवी इलेक्ट्रिक वाहने जागतिक दर्जाची आहेत. या वाहनांना जागतिक बाजारपेठेत प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
या कंपनीचे अगोदरच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मोरोक्को, चिली येथे उपस्थिती आहे. या ठिकाणी कंपनीचे वितरकांचे जाळे आहे. या ठिकाणी स्कॉर्पिओ वाहनांची विक्री यशस्वीरित्या करण्यात आले आहे. आता एक्स यु व्ही 700, स्कॉर्पिओ एन एक्स, या वाहनांची विक्री होण्याची शक्यता आहे. आता जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करून आम्ही लाईफस्टाईल पिकअप वाहनांची निर्मिती करीत आहोत.
यावर संशोधन आणि विकास करण्यात येत असून ग्लोबल पिकअप या कल्पनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वाहनांचे उत्पादन 2027 पासून सुरू होईल. आता आम्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार केली आहे. या वाहनांचे विक्री ब्रिटन सारख्या विकसित देशातही होऊ शकेल. मात्र त्यासाठी आम्हाला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. आम्ही ते प्रयत्न करणार आहोत. नोव्हेंबरमध्ये कंपनीने बी ई- सहा आणि एक्स ई व्ही 9 ही वाहने सादर केली आहेत. मार्चपासून या वाहनांचे वितरण सुरू होणार आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

