नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने विमा क्षेत्रात काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी कंपनीने कॅनडातील मॅन्यूलाईफ कंपनीबरोबर प्रत्येकी 50% भागीदारीची कंपनी स्थापन केली आहे. सुरुवातीला या क्षेत्रात 7,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांनी सांगितले. या कंपनीचे बाजार मूल्य पुढील दहा वर्षात 18 ते 30 हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असे ते म्हणाले. आम्ही ग्रामीण आणि निमशहरी भागात क्रमांक एकची विमा कंपनी होण्याचा संकल्प केला असून त्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. भारतात विमा घेण्याचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. त्यामुळे आमची कंपनी भारतात अधिक ताकतीने काम करू शकणार आहे. विमा नियंत्रणाकडे आम्ही परवान्यासाठी तीन महिन्यात अर्ज करणारा असून आमचे प्रत्यक्ष काम 15 ते 18 महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. महिंद्रा समूहाचे ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात काम आहे. याचा विमा कंपनीला आपले कामकाज वाढविण्यासाठी उपयोग होणार आहे. शहा यांनी सांगितले की सुरुवातीला आम्ही जीवन विमा क्षेत्रात काम करणार आहोत. आमच्या कामकाजाच्या आधारावर विमा नियंत्रकांनी परवानगी दिली तर संयुक्त परवाना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.