पिंपरी (प्रतिनिधी) – पोलिसांना वाहनांअभावी प्रभावी गस्त घालता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महिंद्रा कंपनीने दहा मोटारी पोलिसांना गस्तीकरिता दिल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता लॉकडाऊन करीत असल्याची घोषणा केली. तसेच या काळात संचारबंदीचे आदेशही जारी करण्यात आले. यामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह एकूण 80 ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. तसेच शहराच्या अंतर्गत भागातही पोलीस गस्त घालत आहेत. संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पोलीस गस्त घालत आहेत.
सध्या पिंपरी चिंचवड पोलिसांकडे 83 दुचाकी आणि 89 चारचाकी वाहने आहेत. मात्र सध्या असलेली ही वाहने कमी पडत आहेत. पोलिसांची ही अडचण दूर करण्यासाठी महिंद्रा कंपनी पुढे आली आहे. त्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत पोलिसांना गस्त घालण्यासाठी दहा मोटारी उपलब्ध करून दिल्या आहेत. या मोटारीवरील चालकही याच कंपनीने दिले आहेत. यामुळे आगामी काळात आणखी प्रभावी गस्त पोलिसांकडून होणार आहे.