महेश नागरी संस्थेची अनाथ मुलांसोबत दिवाळी

कात्रज : कात्रजमधील महेश नागरी मल्टिस्टेट आणि राठी परिवाराने पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील ममता बालसदनमध्ये अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. काका, तुम्ही आल्यावरच आमची खरी दिवाळी सुरू होते. तुमच्याशिवाय दिवाळीची मजा नाही, अशा प्रेमळ शब्दांत ममता बालसदनमधील चिमुकल्यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राठी उद्योग समूहाचे मगराज राठी यांच्याबद्दलचा आपुलकीचा भाव व्यक्त केला. यावेळी मुलांना फटाके आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
गेल्या २३ वर्षांपासून मगराज राठी आणि त्यांचा परिवार ममता बालसदन या सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेशी जोडले गेले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात राठी कुटुंब स्वतःच्या परिवारासह बालसदनमध्ये येते आणि मुलांसाठी फटाके, सुग्रास भोजन, कपडे तसेच किराण्याचा साठा देत आनंद साजरा करते. यंदाही भाऊबीजेच्या दिवशी राठी कुटुंबाने पावभाजी, भेळ, विविध खाद्यपदार्थ आणि भेटवस्तूंसह मुलांसोबत दिवाळी साजरी केली. फटाके फोडत, एकत्र जेवत, खेळत मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
मगराज राठी म्हणाले, व्यवसायानिमित्ताने पुरंदरमध्ये आलो आणि योगायोगाने ममता बालसदनला भेट दिली, तेव्हापासून हे नाते मनापासून जोडलं गेलं. सिंधूताई जिवंत असताना त्यांनी माझ्याकडून घेतलेली साडी नेहमी हक्काने वापरत असत. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या समवेत एका ताटात जेवण्याचा क्षण आजही आमच्यासाठी अमूल्य आहे. कोणताही उपक्रम सुरू करणे सोपे असते; परंतु तो अविरतपणे चालू ठेवणे हे काम कठीण असते. मात्र, राठी परिवार आणि महेश नागरी मल्टीस्टेट संस्थेकडून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे कौतुक आहे, असे ममता बलसदनच्या प्रमुख ममता सकपाळ यांनी म्हटले.
ममता बालसदनचे व्यवस्थापक दीपक गायकवाड म्हणाले, माई नेहमी म्हणायच्या मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा.’ पण माई गेल्यानंतरही राठी कुटुंबाने हे नातं कायम ठेवलं आहे. त्यांनी घेतलेली जबाबदारी आजही तितक्याच मनापासून निभावतात. या प्रसंगी ममता सपकाळ, महेश नागरी पतसंस्थेचे मगराज राठी, रवि अग्रवाल, कैलाश सारदा तसेच राठी परिवार उपस्थित होता.

