MLC elections : विधानपरिषद निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीतून मोठी घोषणा; म्हणाले – ‘सर्व 17 जागा….’
MLC elections : विरोधकांकडून महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचे दावे केले जात असले तरी महायुती एकसंघ असून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहे. राज्याची वेगाने प्रगती होत असल्याने विरोधक दिशाभूल करणारी विधाने करत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

MLC elections : आगामी विधान परिषद निवडणुकीतील सर्व १७ जागा महायुती एकत्रितपणे लढवणार असून त्या सर्व जागांवर विजय मिळवू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचे सूत्र यापूर्वीच सूचित केले आहे. महायुतीत कोणतीही अडचण नसून चर्चा सुरू आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवून सर्व जागा जिंकतील, असा दावा त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांकडून निवडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २५ जूनला मतमोजणी होणार आहे.
औरंगाबाद-जालना भाजपकडे ?
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर भाजपने औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघ भाजपलाच मिळावा, अशी मागणी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ६०० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये भाजपचे २८० सदस्य आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी आणि शिंदेसेनेने पाठिंबा द्यावा. २०१९ मध्ये अविभाजित शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या जागेवर विजय मिळवला होता.
हेही वाचा – 1 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी PSI एसीबीच्या जाळ्यात; पदोन्नतीच्या दिवशीच कारवाई
मनोज जरांगे आंदोलनावर म्हणाले…-
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी नुकतीच जरांगे यांची भेट घेतली असून त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असून उपोषणाची वेळ येऊ नये, हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी ३० मेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
समान नागरी कायद्याबाबत भूमिका –
समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) विचारले असता, शिवसेनेची सुरुवातीपासूनच ‘एक देश, एक कायदा’ ही भूमिका असल्याचे शिंदे म्हणाले. सर्वांना समान अधिकार आणि समान न्याय मिळाला पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकाच देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिर उभारणी, कलम ३७० हटविणे आणि समान नागरी कायदा लागू करणे ही बाळासाहेब ठाकरे यांची तीन स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केली असून तिसरे स्वप्नही पूर्ण होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
यूसीसीमुळे आरक्षण किंवा आदिवासी समाजाच्या परंपरांवर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासींचे हक्क, संस्कृती आणि परंपरांना धक्का लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरक्षण आणि समान नागरी कायद्याचा कोणताही संबंध नसून अनुसूचित जाती-जमातींसाठीचे आरक्षण संविधानाने संरक्षित केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
महायुती एकसंघ –
विरोधकांकडून महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचे दावे केले जात असले तरी महायुती एकसंघ असून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहे. राज्याची वेगाने प्रगती होत असल्याने विरोधक दिशाभूल करणारी विधाने करत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.





